
मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत; चार सदनिकांच्या घोटाळ्यात दोषी ठरवले, अटक अटळ?
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून चार सदनिका लाटल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणी करत, फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.
या निकालानुसार दोघांनाही दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र निकालाच्या वेळी आरोपी म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक कायदेशीर प्रक्रिया टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणात बाजू मांडणारे अॅड. आशुतोष राठोड यांनी सांगितले की, आरोपीने निकालावेळी न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक होते. या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून, सीआरपीसी अंतर्गत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही तासांत अटकेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या निकालामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले असून, राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला आहे. कायद्यानुसार दोषी ठरल्यास आमदारकीही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री यांनी स्वतः दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी वकिलांकडून करण्यात आली आहे. न्यायप्रक्रियेची विश्वासार्हता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.