
आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी न झाल्याने एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी आता बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.केशव नाना क्षीरसागर, संजीव कवडे, आनंद अंकुश, तुषार पवार, बाबा सय्यद यांच्यासह आणखी तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालक उदय चंद्रकांत शिर्के यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी की, रिक्षा चालकांनी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात सोमवारी चक्काजाम आंदोलन पुकारले होते.. या आंदोलनात सहभागी न झालेल्या रिक्षांवर लक्ष ठेवून रिक्षा चालवताना कोणी आढळून आल्यास त्यांच्या रिक्षा फोडून टाका अशी चितावणी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे रिक्षा घेऊन आंबेगाव बुद्रुक परिसरातून जात असताना तीन ते चार इस्मानी त्यांची रिक्षा अडवली आणि रिक्षाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील पाचशे रुपये घेऊन आरोपी पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
