PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । खासदार श्रीरंग बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याअंतर्गत आणि खासदार स्थानिक विकास निधीतून तीर्थक्षेत्र देहूगाव परिसरामध्ये विकास कामांचा धडाका सुरु झाला आहे. तीन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते रविवारी (दि.1) झाले. तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, अशी ग्वाही खासदार बारणे यांनी देहूकरांना दिली.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्यपहार अर्पण करून झाली. देहू हद्दीतील समर्थनगर, देहूगाव जुनपालखी मार्ग, ओंकार सोसायटी, भैरवनाथ नगर, व्यंकटेश सोसायटी, शिवनगरी सोसायटी, राजमाता जिजाऊ सोसायटी, गंधर्व विहार सोसायटी, विठ्ठलनगर येथील राजमुद्रा सोसायटी व श्री विघ्नहर्ता सोसायटी येथील अंतर्गत रस्त्यांच काँक्रीटी करणाचे भूमीपूजन झाले. त्याचबरोबर माळीनगर येथील सभामंडपाचे, शिवनगरी येथील पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामाचे लोकार्पण झाले. देहू परिसरात चार हायमास्ट दिवे खासदार निधीमधून देण्यात आले. त्याचेही भूमीपूजन करण्यात आले.