
कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन चिमुकले जखमी; कुत्र्यांचा उच्छाद सुरूच
पुणे लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जनआंदोलनानंतर देखील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाटस रस्त्यावर दोन लहान मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. दोघे मुले त्यात गंभीर जखमा झाले आहेत. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांचा प्रश्न कायम असून, पालिकेकडून फक्त कार्यवाही सुरू आहे, असे उत्तर दिले जात आहे. गेल्या आठवड्यात बारामती पालिकेसमोर नागरिकांनी आंदोलन करत पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना यासंबंधी निवेदन दिले. कुत्र्यांच्या नसबंदीसाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवत असून लवकरच कार्यवाही होईल, असे रोकडे यांनी आश्वासन दिले. मात्र तत्काळ कार्यवाही अपेक्षित असताना ती होत नाही.
शहरातील सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर पडणे अगदी मुश्किल झाले आहे. सकाळ-सायंकाळन चालण्यासाठी, व्यायामासाठी ज्येष्ठांना बाहेर पडता येईनासे झाले आहे.
त्यातच, सरकारी रुग्णालयात रेबीजची लस उपलब्ध नसते. खासगी दवाखान्यात मोठी रक्कम मोजून उपचार घ्यावे लागतात. पालिकेने यावर तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे. मात्र बारामती पालिकेकडून सध्या या प्रश्नी टाळाटाळ केली जात असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. भार्गव पाटसकर यांनी व्यक्त केले आहे.